मुंबई - राज्यात कोरोनाने महाभयंकर परिस्थिती बनवली असतानाच दुसरीकडे राजकीय भूकंप होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (सोमावर) दुपारी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर रात्री त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतली. या दोन्ही भेटीनंतर राज्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत यांनी केलेले ट्विट... मातोश्रीवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच संजय राऊत हेही उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात पवार यांनी एकदाही मातोश्रीचा दरवाजा ओलांडला नव्हता. परंतु काल अचानक त्यांनी मातोश्रीचा दरवाजा गाठला आणि तब्बल दीड तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ही बैठक पार पडली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करत भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी सुद्धा काल (सोमवार) राज्यपालांची भेट घेतली होती. त्यामुळे येत्या काळात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मातोश्रीवरील या भेटी संदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मातोश्रीवर बैठक झाल्याची माहिती दिली. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की "शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल उशिरा रात्री मातोश्रीवर भेट झाली. यात दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थितीबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोट दुखी समजावी सरकार मजबूत आहे चिंता नसावी जय महाराष्ट्र"
सोमवारी पवार यांची राज्यपाल भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी केंद्रातून काहीतरी मोठ्या हालचाली सुरू असल्याचे संकेत या बैठकीत पवार यांना देण्यात आले असल्याचेही बोलले जात आहे. यामुळेच पवार यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यासंदर्भातील राजकीय चर्चा केली असावी असे सांगण्यात येते.
हेही वाचा - सीबीएसईसाठी १ हजार ५०० अधिक परीक्षा केंद्र वाढविणार, रमेश पोखरियाल यांची माहिती
हेही वाचा - दिल्लीला जाणारी फ्लाईट पूर्वसूचना न देता रद्द, प्रवाशांची नाराजी