मुंबई - राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंजाबमधील अमृतसर येथील राणा शुगर्स साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. या कारखान्यात बीटपासून साखरेचे उत्पादन घेतले जाते. राणा गुरुजीत सिंग यांनी हा प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. महाराष्ट्रातही बीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग शक्य असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
राणा गुरुजीत सिंग यांनी अमृतसरमध्ये बीटपासून साखर निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या कारखान्याला शरद पवारांसह, आमदार दिलीप वळसे पाटील, रोहित पवार, आशुतोष काळे यांनी भेट दिली. यावेळी पवारांनी राणा गुरुजीत सिंग यांच्या या प्रयोगाचे अभिनंदन केले. या प्रयोगामुळे गळीत हंगाम दोन ते तीन महिने वाढवला जाऊ शकतो. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना या प्रयोगामुळे मोठा दिलासा मिळू शकेल असेही पवार म्हणाले.