मुंबई - राज्य सरकारने गडचिरोलीतील विकास कामांवर लक्ष न दिल्याने परिस्थिती अवघड झाली असल्याची माहिती त्या भागातल्या काही स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे या नक्षली हल्ल्याला सरकारच जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ते बोलत होते.
गडचिरोली भागातला नक्षलवाद हा आजचा प्रश्न नाही. आमच्या काळातही हा प्रश्न होताच. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतले होते. त्या भागाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. ते २ महिन्यातून एकदा गडचिरोलीला जाऊन आढावा घेत होते. मात्र, आता ती स्थिती राहिली नाही. ज्या सत्ताधाऱ्यांकडे आज जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांच्याकडेच या हल्ल्याची जबाबदारी जात असल्याचेही पवार यांनी सांगितले.
आता या प्रश्नाकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता विकासाच्या दृष्टीने बघायला पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात विदर्भातील नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. नागपूरमध्ये वास्तव्यास असलेले मुख्यमंत्री यांनी या भागात अधिक लक्ष दिले असते, तर कदाचित ही घटना घडली नसती, असेही पवार म्हणाले.
गडचिरोलीतील प्रकार चिंताजनक आहे. मी मुख्यमंत्री असताना नक्षलवादाची सुरुवात झाली होती. पण आम्ही त्याकडे फक्त कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहिले नाही, तर विकासापासून वंचित राहिलेल्या या परिसराला विकासात कसे आणता येईल? याकडे लक्ष दिले. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तर लोकांच्या नाराजीचा फायदा नक्षली उचलतात, असेही शरद पवार म्हणाले.