मुंबई - मी माझ्या घरातील बालहट्ट पुरवू शकतो. परंतु, दुसऱ्याच्या घरातील बालहट्ट कसा पुरविणार ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे-पाटील यांच्यांवर मिश्कील टीका केली. सुजय यांचा बालहट्ट हा त्यांच्या वडिलांनी पूर्ण करावा. परंतु, इतर पक्ष त्यांचा बालहट्ट पूर्ण करण्यास जबाबदार नाही, असेही पवार म्हणाले.
भाजपमध्ये आज प्रवेश केलेले सुजय विखे हे राज्यातील कोणत्या पक्षाचे मोठ्या स्तरावरची व्यक्ती नाहीत. तसे त्यांचे वलयही नाही. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाला किती महत्व द्यायचे हे तुम्ही ठरवा, असे पवार यांनी माध्यमांना सांगितले.
लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यासंदर्भात त्यांना विचारले असता पवार म्हणाले, की मला अनेकांनी पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी विनंती केली. मी ऐकतो आणि एन्जॉय करतोय. मात्र, माझ्याबद्दल जे अपप्रचार करत आहेत, त्यांना मी सांगतो, की मी १४ वेळा लोकसभेला उभे राहिलो आणि निवडूनही आलो आहे. मात्र, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्याप्रमाणे एकदाही पडलो नाही. आज सलग ५२ वर्षे राजकारणात आहे. मात्र, जे माझ्याबदृल काही वक्तव्य करत आहेत त्यांच्या ज्याच्या त्याच्या कौटुंबिक आणि पक्षीय संस्कारानुसार ते वक्तव्य करत असतात. त्याकडे लोकही आणि आपणही लक्ष न दिलेले बरे, असेही पवार म्हणाले.
माढ्याच्या उमेदवारीबाबत विजयसिंह मोहिते पाटलांना मी स्वतः विनंती केली की तुम्ही उभे रहा. त्यामुळे ते उभे राहतीलही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याबद्ल चिचारले असता पवार म्हणाले, की आम्ही कधीही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोललो नाही. आम्हाला त्यांच्योसाबत बोलण्यास काहीही रस नाही. त्यांची २२ जागांवर ताकद असेल तर वेगळे लढावे आमची हरकत नाही. राज्यात आघाडीच्या जागावाटपांचा प्रश्न जवळपास निकाली लागली आहेत. आता काँग्रेसकडून जी यादी जाहीर केली जाणार आहे ती एकत्र जाहीर केली जावी असे आपल्याला वाटते, असेही पवार म्हणाले.