मुंबई - सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला विकास आणि विकास याच मुद्द्यावर मते मागितली होती. आज त्याला पाच वर्षे पूर्ण झाली असून आता ते विकासाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करत आहेत. अशा राजकारणी लोकांना जनतेनी दूर ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत केले. उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या गोवंडी येथील प्रचार सभेत शरद पवार यांनी मोदींवर टीका केली.
मोदींना देशातील जनतेपुढे येऊन मते मागण्याचा कुठलाही अधिकार उरला नाही त्यांनी ज्याप्रमाणे विकासाचा प्रश्न किती सोडवला, हे न सांगता आता आपल्या फायद्यासाठी हिंदुत्वाच्या नावाने राजकारण सुरू केले आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कोणताही पंतप्रधान हा त्या पदाची शपथ घेत असताना तो कोणत्याही एका धर्माचा नसतो तर तो सर्व धर्माचा, सर्वांचा असतो. परंतु मोदींनी या शपथेची मर्यादा तोडून त्याचाही अवमान केला आहे. त्यामुळे इतर धर्माचा द्वेष पसरवण्याचे काम करणाऱ्या मोदी यांना देशातील जनतेसमोर येऊन मते मागण्याचा अधिकार नसल्याचे पवार यांनी सांगितले.
मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी प्रत्येक राज्यात जाऊन देशाची जबाबदारी घेण्यासाठी लोकांना विकासाच्या गप्पा मारल्या. त्यावर देशवासीयांनी विश्वास ठेवला आणि त्यांना संधी दिली होती परंतु आता त्यांचे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विकासाच्या मुद्द्याला बगल देत देशातील शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न बाजूला ठेवले आहेत. खरेतर त्यांनी या प्रश्नावर बोलणे अपेक्षित होते, हे परंतु राज्यात वर्धा येथे झालेल्या त्यांच्या पहिल्या सभेत त्यांनी हे सर्व विकासाचे प्रश्न सोडुन हिंदुत्वाच्या नावाने आपले राजकारण सुरू केले. त्याचे उत्तर देशातील जनता आपल्या मतदानातून देतील, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. देशातील शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न अर्धवट सोडणाऱ्या तसेच धर्माच्या नावाने द्वेष पसरवणाऱ्या शेतकऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी असक्षम ठरलेल्या मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवावे आणि या देशात लोकशाही ही अबाधित ठेवावी, असे आवाहन पवार यांनी या मतदारसंघातील मतदारांना केले. तसेच संजय दिना पाटील यांच्यासारख्या तरुणांना पुन्हा संधी देऊन देशातील मोदी-शहाला हाकलून द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, खासदार अॅड. माजिद मेमन, आमदार हरिभाऊ राठोड, रिपाइं नेत्या सुषमा अंधारे, राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते.