मुंबई - आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर आजच्या दिवशी माझ्या मातोश्रींचाही वाढदिवस असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच १३ डिसेंबरला माझ्या पत्नीचा वाढदिवस असतो. सार्वजनिक जीवनात वावरत असताना यश, अपयश येत असते. मात्र, या साऱ्यातून उठून उभे राहण्याची उर्जा मला आई आणि महाराष्ट्राच्या सर्व सामान्य माणसांकडून मिळत असल्याचे पवार म्हणाले. त्यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
माझ्या मातोश्रींनी मोठे कष्ट घेऊन आम्हाला वाढवले. त्या शेती करायच्या तर वडील नोकरी करायचे. शेतीत पीकलेले धान्य बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाही ते करायचे. साधारण १९३६ चा काळ असेल, आमच्या मातोश्री लोकल बोर्डावर होत्या. आपल्या समाजाचा विकास कसा करायचा? या विचारांच्या त्या होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी त्या सदैव आग्रही राहत. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आज आम्ही सारे कार्यरत असल्याचे पवार म्हणाले.
हे वाचलं का? - '....मात्र, गोपीनाथ मुंडेंनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही'
आपण ज्या माणसाच्या परिवर्तनसाठी लढतो, त्यांची शक्ती आपल्याला मिळाली तर कोणतेही संकट आपण पार करू शकतो. त्यामुळेच मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमी सांगत असतो, की आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या माणसाच्या उपयोगी यायला हवं.
हे वाचलं का? - पक्ष माझ्या बापाचा, मी का सोडू? रक्तात बेईमानी नाही, पंकजा मुंडेंचे सुचक इशारे
आज (१२ डिसेंबर) शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ८० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी दिला गेला. ही रक्कम राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून दिली आहे. आज आत्महत्या, कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ अशा विविध कारणाने शेतकरी कुटुंब उघड्यावर पडली आहेत. हा निधी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाईल. संकटात सापडलेली असंख्य कुटुंब आपल्याला उभे करायची आहेत, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी सर्वांचे आभार मानले.