मुंबई - एक गृहमंत्री गडचिरोलीतल्या लोकांचा, अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जीवापाड मेहनत घेतो. तर दुसरा गृहमंत्री या भागात फक्त पुष्पचक्र वाहायला जातो, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नसल्याचे पवार यावेळी म्हणाले.
गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्लयावरुन शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर जोरदार निशाणा साधला. दिवंगत आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना गडचिरोलीचे पालकमंत्रीपद द्या, असा आग्रह धरला होता. ते गृहमंत्री होते तेव्हा दर महिन्यांतून त्यांच्या एक-दोन चकरा गडचिरोलीत असायच्या. भामरागडच्या आतल्या भागात आर आर पाटील लोकांना धीर द्यायला मोटरसायकलवर जात होते. तेथील लोकांना धीर देत होते.
प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून विकासाचाही
माझ्याकडे जेव्हा राज्य सरकारची जबाबदारी होती तेव्हा पोलीस अधिकारी व आयएएस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्यासंबधी चर्चा होत असे. हा प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून विकासाच्या बाबतीत एखादा परिसर मागे राहिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून निर्माण झाला असल्याचे पवार म्हणाले. यातून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेचा फायदा घेणारी नक्षल प्रवृत्ती त्यामुळे पुढे आली. नक्षलवाद्यांना विकासही नको आणि तेथील परिस्थिती तशीच राहावी ही त्यांची अपेक्षा आहे. त्यावेळी अंदाजपत्रकात गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी आम्ही स्वतंत्र विकासाचे बजेट दिल्याचे पवार म्हणाले.