मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे उद्या सूप वाजणार आहे. परंतु या अधिवेशनात अनेक विषय चर्चेचे राहिले. चार आठवडे चाललेल्या या अधिवेशनाची उद्या सांगता होणार असून सत्ताधारी व विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यावर या अधिवेशनात सभागृहात व सभागृहाबाहेर जुंपली. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे सहकारी भरत गोगावले यांना सभागृहात दिलेली मसाला इलायची ही सुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे.
मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले? : या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, या संदर्भात मी सोशल मीडिया वर एक क्लिप पाहिली. आमदार भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली होती. मी मसाला इलायची नेहमीच सोबत ठेवत असतो. ती इलायची मी भरत गोगावले यांना दिली होती. व त्याबाबत चुकीची माहिती पसरवली गेली, असे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंवर टीका : मंत्री शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नको त्या विषयावर बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अधिक बोलायला पाहिजे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सभागृहात बोलतात. पण ठाकरे गटाचे जे काही आमदार उरलेले आहेत व जे युवा नेते आहेत, त्यांनी नको त्या विषयावर विनाकारण बोलू नये. कारण, मी आयुष्यात कधीच तंबाखू खाल्ली नाही. हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तसेच बोलताना घसा सुखत असतो, म्हणून मसाला इलायची सोबत ठेवावी लागते, असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
तंबाखू खाणारे, हे कसले राज्यकर्ते? : याबाबत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, झाला प्रकार फार निंदनीय आहे. जो काही प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने टेलिव्हिजनवर पाहिला आहे. तसेच हे कसले राज्यकर्ते, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.