मुंबई - कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याची खबरदारी म्हणून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाने लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष कक्ष तयार करावेत. तसेच हे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठवावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज संबंधीत विभागाला दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागातील प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्यासमवेत ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि बालरोगशास्त्र प्रमुख उपस्थित होते.
मुलांसाठी विशेष कक्ष उभारा
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून यामध्ये लहान मुलांना धोका अधिक आहे असे वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे आवश्यक खबरदारी म्हणून प्रत्येक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक सुविधा, उपाययोजना, विशिष्ट औषधांची यादी याबाबतची सर्व माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे त्वरित पाठवावी अशा सूचना मंत्री देशमुख यांनी दिल्या.
हेल्पलाईन सुरू करा
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या लहान मुलांवर उपचारासह समुपदेशनावरही भर दिला जात आहे. दरम्याना या मुलांच्या पालकांचेही समुपदेशन करण्यात यावे जेणेकरून रुग्णालयातून ही लहान मुलं घरी घेल्यानंतर त्यांना आणि पालकांनाही काही अडचणी वाटणार नाहीत. तसेच येणाऱ्या काळात शासकीय रुग्णालयांत फोनद्वारे समुपदेशन सुरू करावे. तसेच यासाठी हेल्पलाइन सुविधाही निर्माण करण्यात याव्यात असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - 'लस महोत्सव' साजरा केला, मात्र लसीची व्यवस्था नाही'; प्रियंका गांधींचा मोदींवर घणाघात
हेही वाचा - तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलची दरवाढ; परभणी, इंदूरसह विविध शहरांमध्ये शतकपार