मुंबई: संजय पांडे यांनी आयुक्त पदाचा पदभार (Mumbai CP Sanjay Pande) स्वीकारल्यापासून मुंबईकरांसाठी विविध घोषणा केल्या. ज्यात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत सर्व बांधकामांवर बंदी, सीनियर सिटीजन साठी पोलीस स्टेशन मध्ये सन्मानजनक वागणूक, पासपोर्ट व्हेरिफिकेशन (Passport verification) साठीपोलीस अधिकाऱ्यांकडून घरीच व्हेरिफिकेशन अशा घोषणांचा समावेश होता. त्यानंतर आता गृहनिर्माण विभागाकरिता केलेली घोषणा ही महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण विभागाच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये येतात मात्र निवारणासाठी कुठलीही सोय नसल्याने वर्ष-वर्ष या तक्रारी प्रलंबित असतात संजय पांडे यांनी आता गृहनिर्माण विभागाच्या तक्रारी करता स्वतंत्र कक्ष उभारण्याची घोषणा केल्याने या तक्रारी लवकर निकाली काढता येतील त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घाटकोपरमधील म्हाडाच्या गृहनिर्माण संस्थेंच्या अध्यक्षाने बैठकीच्या इतिवृत्तामध्ये फेरफार केल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने इतिवृत्तामध्ये फेरफार करत रहिवाशांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याची तक्रार होती. या प्रकरणी रहिवासीयांनी घाटकोपर मधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अशा तक्रारीच्या पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.