मुंबई - कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमे अंतर्गत आज(गुरुवारी) बीकेसी कोविड सेंटरमध्ये केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले गेले. 500 जणांना पहिला डोस दिला गेला. तर, अपुऱ्या डोसमुळे 45 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण आज बंद होते, अशी माहिती डॉ. राजेश डेरे यांनी दिली आहे.
लस टंचाईचा फटका -
एका दिवसात 2 हजार नागरिकांना लस देण्याची तयारी बीकेसी कोविड सेंटरची आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून मुंबईला पुरेशी लस मिळत नाहीत. त्यामुळे अनेकदा लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. लस उपलब्ध होत नसल्याने ठराविक नागरिकांच लस दिली जात असून उर्वरित लोकांना निराश होऊन परत जावे लागत आहे.
आज कोविशिल्डचे 500 डोस उपलब्ध -
बीकेसी कोविड सेंटरमधील लसीकरण केंद्रासाठी आज केवळ कोविशिल्डचे 500 डोस उपलब्ध झाले. हे डोस 18 ते 44 वयोगटासाठी आहेत. त्यामुळे या डोसचा वापर याच गटासाठी करण्यात आला. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. दरम्यान, नोंदणी असलेल्यां नागरिकांचेच लसीकरण करण्यात आले. केवळ दोन तासात हे लसीकरण पूर्ण झाले, असेही डॉ. डेरे यांनी सांगितले. 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बंद राहील, याची माहिती अगोदरच देण्यात आली होती. त्यामुळे सेंटरवर आज ज्येष्ठ नागरिकांची गर्दी नव्हती.