मुंबई - विधानपरिषदेतील १८ सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत संपत आल्याने शनिवारी त्यांना निरोप देण्यात आला. निवृत्त होत असलेल्या या आमदारांमध्ये ७ काँग्रेस, ६ राष्ट्रवादी, ३ भाजप, १ शिवसेना आणि १ पीआरपीचे आमदार आहे.
हेही वाचा - COVID 19 : 'आदेश न पाळल्यास कठोर कारवाई केली जाईल'
राज्य विधानपरिषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. १८ सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत संपत आल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांना निरोप देण्यात आला. या निवृत्त होणाऱ्या आमदारांत काँग्रेसचे आनंदराव पाटील, हरिभाऊ राठोड, अनंत गाडगीळ, हुस्नबानु खलिपे, रामहरी रुपनवर, प्राध्यापक जर्नादन चांदुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर, आनंद ठाकुर, हेमंत टकले, प्रकाश गजभिये, ख्वाजा बेग, विद्या चव्हाण, जगन्नाथ शिंदे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपच्या स्मिता वाघ, पृथ्वीराज देशमुख, अरुण अडसड आणि पीआरपीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे. तर, २४ एप्रिलला ८ आमदारांची मुदत संपणार असून, ६ जूनला ८ आमदार आणि १५ जूनला २ आमदारांची मुदत संपणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाई गिरकर, भाई जगताप, शरद रणपिसे यांनी निवृत्त होत असलेल्या आमदारांच्या सभागृहातील योगदानाविषयी आठवणी सांगितल्या. तर, यावेळी या आमदारांनीही सभागृहातील कामाकाजाविषयीचा अनुभव सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हा निरोप समारंभ नसून कृतज्ञता समारंभ आहे. शाळेतला पहिला दिवस कधी उगवतो, शेवटचा दिवस मावळतो कधी कळत नाही. तशी आजच्या दिवसाची तुलना मी शाळेच्या शेवटच्या दिवसाशी करेन. वरिष्ठ सभागृह विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंतांचे आहे. येथील सदस्यांचे बोलणे प्रबोधनपर असते. त्यांच्या विचारांचा फायदा सभागृहाला पर्यायाने सरकारला झाला आहे, असेही मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी निरोपाच्या प्रस्तावावर बोलताना व्यक्त केले.