मुंबई - शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य सेवेतील डॉक्टर, नर्स तसेच इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून अहोरात्र काम करत आहेत. त्याचवेळी कायमस्वरूपी पदावरील डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थश्रेणी पदावरील कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीसा काढण्याची सूचना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रमुख रुग्णालयातील अधिष्ठातांना दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील सर्व अधिष्ठातांची आढावा बैठक महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. पेडणेकर म्हणाल्या, प्रमुख रुग्णालयातील मृतदेहांची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक असून संबंधित पोलिस स्टेशनबाबत काही अडचण असल्यास रुग्णालयनिहाय यादी सादर करावी. जेणेकरून याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढता येईल.
या बैठकीदरम्यान रुग्णवाहिकांची विभागनिहाय कशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली याची सविस्तर माहिती महापौरांनी जाणून घेतली. रुग्णांची कुठल्याही प्रकारे हेळसांड होऊ नये, असे निर्देश महापौरांनी सर्व अधिष्ठातांना यावेळी दिले. यापुढील काळात महापालिकेने रुग्णवाहिकांची स्वतः खरेदी करण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे औषध साहित्यांचा पुरेसा साठा आहे का? त्याची सविस्तर माहिती संबंधित अधिष्ठातांकडून जाणून घेतली. व्हेंटिलेटरची कमतरता असल्यास त्याची ताबडतोब मागणी नोंदविण्याची सूचनाही महापौरांनी यावेळी केली.
मृत्यू प्रमाणपत्राबाबत अडचणी दूर करा -
आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी मृत पावलेल्या व्यक्तींचे मृत्युचे प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत मृत व्यक्तीच्या आजारासंबंधित कागदपत्रे तपासून महापालिकेच्या रुग्णालयातर्फे मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्वसाधारण आजाराबाबत रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. याबाबत विभाग निहाय २६ 'आपली चिकित्सा केंद्रे' सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. केसकर यांनी दिली. या सर्व केंद्राची यादी सादर करण्याची सूचना आरोग्य समिती अध्यक्ष यांनी यावेळी केली. गरोदर मातांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती डॉ. केसकर यांनी दिली.
स्मशानभूमीत मुक्ती मशीन लावा -
मुंबईच्या विविध स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद असल्याचा मुद्दा महापौरांनी यावेळी उपस्थित केला. बहुतांश विद्युतदाहिनी सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी यावेळी दिली. याबाबत मुक्ती पॅटर्नच्या मशीन्स चांगल्या असून या मशीन स्मशानभूमीत बसविण्याची सूचना महापौरांनी केली. गोरखपूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध असलेल्या व महापौरांनी नामकरण केलेल्या "मुक्ती" पॅटर्नच्या मशीनमध्ये फक्त 100 किलो लाकडे लागतात तर इतर मशीनमध्ये 300 किलो लाकडे लागतात. यामुळे, मुक्ती मशीन पर्यावरण रक्षणासाठी चांगल्या असल्याचे महापौरांनी सांगितले.
या बैठकीला उपायुक्त (आरोग्यसेवा) रमेश पवार, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रमेश भारमल, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गूजर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.