मुंबई- 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी', ही अशी मोहीम आहे जिथे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत. त्यामुळे, प्रत्येक सरपंचाने एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवावी व परिवारांना आरोग्यसंपन्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आज मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आयोजित एका ऑनलाइन मेळाव्यात राज्यातील सरपंचाना संबोधित केले व या मोहिमेचे उद्घाटनही केले. या वेब मेळाव्यास राज्यातील सुमारे २८ हजार सरपंचांची उपस्थिती होती. या मोहिमेस ऐतिहासिक मोहीम असे संबोधून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सरपंचांनी आपापल्या गावातील नागरिक मास्क घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन करत आहेत का, हात धुणे वगैरे स्वच्छता पाळताहेत का, या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे व हे नियम पाळण्यास लोकांना बाध्य करावे. गावकरी हे सरपंचांचे ऐकतात, विशेषत: या कोरोना साथीमध्ये गावोगावी सरपंचानी प्रयत्नपूर्वक कोरोनाला आपल्या गावात येऊ देण्यापासून रोखले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही लोकांची चळवळ करा
आजपर्यंत गेल्या ६ महिन्यात कोरोनाविरुद्ध आम्ही लढत आहोत. पण ही लढाई आता एकांगी राहणार नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेऊन ही लोकचळवळ करा, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एका महिन्यात आपल्याला प्रत्येक घरी दोनदा भेट द्यायची आहे. यासाठी असलेली पथके सर्व घरी व्यवस्थित भेटी देतील याची जबाबदारी सरपंचानी घ्यावी. लॉकडाऊन नंतर आपण सर्व काही सुरळीत सुरू करीत असून सणवार येत आहेत. सर्वधर्मियांनी संयम पाळून ते साजरे केले आहेत. पण, तरी देखील मधल्या काळात परत एकदा कोरोना साथीचा संसर्ग वाढला असून आता आपल्याला त्याचा फैलाव थांबवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
नवीन जीवनशैलीची ओळख करून द्या
कोरोनाची जगभर दुसरी लाट आली आहे असे म्हणत, इस्त्रायलने परत एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे. काही देशांनी कायदे कडकरीत्या राबवण्यास सुरुवात केली आहे. नियम पळणार नाहीत त्यांना मोठा दंड भरावा लागतो. पण स्वत:हून आपण नियम पाळणे हे कधीही चांगले. आपल्याला नवीन जीवनशैली आणावी लागणार आहे. ही मोहीम त्याचीच सुरुवात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मोहीम महत्वाकांक्षी
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी काही मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. स्व.आर.आर पाटील यांच्या काळात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, तंटामुक्त चळवळ, हागणदारीमुक्त चळवळ, अशा मोहिमांप्रमाणे माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करा, असे ते म्हणाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, पूर्वीच्या काळी साथ रोग आले की गावातील लोक शेतावर जायचे, ते एकप्रकारे विलगीकरणच असायचे. आताही आपण आरोग्याचे काही नियम पाळले तर कोरोनाची साथ रोखू शकू, असे सांगितले.
सरपंचांकडून स्वागत
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात ६ सरपंचांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यातील फराकटेवाडी येथील सरपंच शीतल फराकटे, रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगावच्या श्रद्धा मोरे, नाशिक जिल्ह्यातील कोटमगावाचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, नागपूर जिल्ह्यातील कढोळीच्या सरपंच प्रांजली वाघ, अमरावती जिल्ह्यातील बोरला आदिवासी गावचे सरपंच संजय भास्कर, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सरपंच विलास शिंदे यांनी या मोहिमेची कशी तयारी केली आहे ते सविस्तर सांगितले, आणि ती पूर्णपणे यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी मोहिमेची माहिती देणारी आरोग्य विभागाची माहिती पुस्तिका, प्रसिद्धी साहित्यांचे देखील प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव संजय कुमार, ग्रामविकास अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे डॉ. सतीश पवार, ग्रामविकास उपसचिव प्रवीण जैन आदींची उपस्थिती होती
अशी असणार मोहीम कोरोना विषाणूला रोखण्यासाठीची मोहीम
आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहाय्यक, गट प्रवर्तक आणि एकूणच या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोठी मोहीम होणार आहे. यात पहिल्या टप्प्यात आजपासून १० ऑक्टोबरपर्यंत घरोघर आरोग्य चौकशी केली जाईल, तपासणी नव्हे. दुसऱ्या टप्पा हा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी २२ दिवसांचा, तर दुसरा १२ दिवसांचा असेल. यात घरातील कुटुंबांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल. त्यांना इतर कोणते आजार आहेत का? हाय रिस्क गटातील, वयस्क यांना असलेले आजार? हृदयविकार, मधुमेह, किडणी, लठ्ठपणा यासारखे आजार असणारे व्यक्ती शोधण्यात येतील. या अनुषंगाने इतर आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येणार आहे. ही मोहीम सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबवली जाऊन गावे, वाडी, पाडे येथील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येईल.
महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करतील. दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. हे स्वयंसेवक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहे. ही लोकांची मोहीम राहणार आहे. यात सरपंच, नगरसेवक यांच्यावरही जबाबदारी असेल.
मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत चालवली जाईल. आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल. जिल्हा स्तरावर नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग असतील. प्रत्येक विभागात पहिल्या तीन संस्था निवडण्यात येऊन त्यांना गुणांच्या आधारे बक्षीस दिले जाईल. विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांना देखील बक्षिसे देण्यात येतील.
हेही वाचा- जम्बो कोविड रुग्णालय उभारणे पराक्रम नाही, तज्ज्ञ डॉक्टरांचीही असते आवश्यकता - गणेश नाईक