मुंबई - नाताळ आणि सांताक्लॉज यांचे अतूट नाते आहे. दरवर्षी नाताळच्या दिवसांत विविध भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करणाऱ्या सांताक्लॉजची सर्वांना आतुरता असते. परंतु यंदा कोरोनामुळे सांताक्लॉज येईल की नाही, याबाबत सर्वाना शंका होती. मात्र, यावेळी सांताक्लॉज भेटवस्तू आणि खाऊचे वाटप न करता कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसत आहे.
यंदाचा सांता मास्क आणि सॅनिटायर घेऊन आला -
यावर्षी सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आले. त्यामुळे सर्व सण शांततेत व साध्या पद्धतीने पार पडले. त्यात आता ख्रिस्ती बांधवांचा नाताळ हा सण दोन दिवसांवर आहे. दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या या सणादरम्यान खाऊ व विविध वस्तूंची भेट देणारा सांताक्लॉज सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सांता एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. दरवर्षी भेटवस्तू देणारा सांता यंदा मास्क आणि सॅनिटायरचे वाटप करताना दिसणार आहे.
जशी परिस्थिती तसा सांता -
सायन फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष अशोक कुर्मी हे गेल्या सहा वर्षांपासून सांताक्लॉज बनून नाताळनिमित्त मुलांना खाऊ आणि खेळणीचे वाटप करतात. पण यंदा गेल्या सात दिवसांपासून ते शीव, धारावी, माटुंगा, वडाळा, सीएसएमटी अशा विविध भागांत जाऊन मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टनसिंगचा संदेश देत फिरत आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा अधिक बस आणि सार्वजनिक वाहनांचे त्यांनी निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच 1500 पेक्षा जास्त नागरिकांना मास्क आणि सॅनिटायरचे वाटप केले आहे. २५ डिसेंबरपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू राहणार आहे.
योग्य ती खबरदारी घेत सण साजरे करा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. रस्त्यावर अनेकजण मास्कशिवाय बिनधास्त फिरत आहे. त्यामुळे ही कल्पना डोक्यात आली. यंदा सांताक्लॉज सगळ्यांच्या आयुष्यात आनंदासोबत सुरक्षिततादेखील घेऊन येणार आहे. दरवर्षी 24 डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गर्दी होते. मात्र, यंदा योग्य ती खबरदारी घेत भगवंताचे दर्शन घ्यावे, प्रथम काळजी करावी, यासाठी मी लोकांना आवाहन करत असल्याचे अशोक कुर्मी यांनी सांगितले.
सांताच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद -
सांताक्लॉजच्या या उपक्रमामुळे नागरिकदेखील आनंदित आहेत. सामाजिक संदेश देत विविध ठिकाणी जाऊन परिसर निर्जंतुकीकरण करणे, लोकांना मास्क वाटप करणे, या उपक्रमांचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. सांतानी दिलेल्या संदेशानुसार आम्ही काळजी घेत नाताळ हा सण साजरा करू, अशी प्रतिक्रिया प्रसाद पानसरे यांनी दिली.