मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचे मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसेच संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील, असे राऊत यांनी सांगितले.
संजय राठोड यांचा राजीनामा?
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती वाऱ्यासारखी फिरत होती. मात्र संजय राऊत यांनी वृत्त फेटाळून लावले असून ही माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपकडून कारवाईची मागणी
भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीचा दाखला देत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव घेत कारवाईची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस महासंचालकांना पत्र लिहून व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपची सखोल चौकशी करून पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
हेही वाचा - कालव्यात कोसळलेल्या बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा 39 वर