मुंबई - कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचा हा सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेतला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संजय राऊत यांनी पुढाकार घेत काँग्रेस नेते, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याशी चर्चा केली आहे. या वृत्ताला स्वतः संजय राऊत यांनीच दुजोरा दिला आहे. धुळे जिल्हा वगळता सहापैकी एकाही जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश आले नाही. अशा परिस्थितीत नंदुरबारमध्ये त्रिशंकू परिस्थिती असल्याने भाजप झेंडा फडकवण्याचा प्रयत्न बाजूकडून होत आहे.
के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून निसटता पराभव झाला आहे. गट गेला असला, तरी नंदुरबारचा गड जिंकण्यासाठी पाडवी आटोकाट प्रयत्न करत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 23 तर भाजपलाही 23 जागांवर आणि शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी 3 जागांसह चौथ्या क्रमांकावर आहे. कोणाच्याच पारड्यात बहुमत मिळाले नसल्याने शिवसेनेची भूमिका या सत्ता स्थापनेत निर्णायक ठरणार आहे.
हेही वाचा - 'मुलगा दुसऱ्याच्या घरी झाला आणि पेढे हे वाटतायत'