मुंबई: खासदार संजय राऊत यांना धमकी देणारा राहुल तळेकर याचा लॉरेन्स बिश्नोई याच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले आहे. राहुल तळेकर हा पुण्यातील रहिवासी असून त्याचे स्वतःचे हॉटेल आहे. रात्री संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्याने संजय राऊत यांचा नंबर मिळवून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संजय राऊत यांनी त्याचा फोन उचलला नाही; म्हणून त्याने त्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या दिल्या असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आलेला आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने राहुल तळेकर याला कांजुर पोलीस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.
दारूच्या नशेत केले कृत्य: या आरोपीचा कुठलाही गॅंगशी संबंध नसून युट्युबवर व्हिडीओ सर्फिंग करताना त्याला लॉरेन्स बिश्नोईबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याने संजय राऊतांना धमकी देताना लॉरेन्सचे नाव घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.
राजकीय पार्श्वभूमी नाही: राहुल तळेकर याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी समोर आलेली नाही. तसेच याआधी त्याचे कोणतेही गुन्हेविषयक कृत्य समोर आलेले नाही. त्याचप्रमाणे मेसेजमध्ये ज्याप्रकारे म्हटले तसे कोणताही गँगस्टरशी त्याचे संबंध असल्याचे जाणवत नाही. तपासातील निष्पन्नाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल: खासदार संजय राऊत यांना काल धमकी मिळाली. या अनुषंगाने आज त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संविधान कलम 504, 506(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
फडणवीसांकडून स्पष्टीकरण: ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या नावावे धमकीचा मॅसेज आल्यानंतर पोलिसांनी मॅसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावला अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे त्या व्यक्तीने दारूच्या नशेत अशी धमकी दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते नागपुरात बोलत होते.
सरकार शांत बसणार नाही: लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या नावावे धमकीचा मॅसेज मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईतील कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलीसांनी तपासाची चक्रे तात्काळ वेगाने फिरवत आरोपीची ओळख पटविण्यात आली आहे. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असली तरी कारवाई होईल असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
हेही वाचा: Amul Milk Price : अमूल दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ, हे आहेत नवे दर