मुंबई : काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती. दोन्ही राऊत बंधूंना धमकी देणारा फोन कॉल व्हायरल झाला होता. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकी देणारा व्यक्ती हा त्यांच्या निकटवर्ती आहे. कांजूरमार्ग पोलिसांनी मयूर शिंदे नामक व्यक्तीला अटक केली आहे.
कांजूरमार्ग पोलिसांची कारवाई : धमकी देणाऱ्याने 'संजय राऊत यांना सकाळची पत्रकार परिषद घेणे बंद करायला सांगा. अन्यथा दोघांनाही गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी दिली होती. या धमकीच्या फोनची तक्रार आमदार सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दिली होती. तर खासदार संजय राऊत यांनी यासंबंधीत पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. दरम्यान कांजूरमार्ग पोलिसांनी धमकी देणाऱ्याला अटक केली आहे. पोलीस मयूर शिंदे या आरोपीची चौकशी करत आहेत. यासंदर्भात आणखी ज्या काही अपडेट असतील त्या लवकरच तुम्हाला देण्यात येतील. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ठरवून कट रचला का? : खासदार संजय राऊत यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेच्या चौकशी बाबतचे पत्र दिले होते. या पत्रानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत बुधवारी रात्री आरोपीला अटक केली. सायबर पोलिसांच्या मदतीने कांजूरमार्ग पोलिसांनी मयूर शिंदे या व्यक्तीला अटक केली. दरम्यान सध्या मयूर शिंदे हा आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. मात्र मयूर शिंदे हा आरोपी आमदार सुनील राऊत यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्यांनीच ठरवून हा कट रचला असल्याचा आरोप आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे व भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
हेही वाचा -