मुंबई - लोकसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा मिळवत भाजप हा देशातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालानंतर आता युतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ असल्याचे आम्ही मान्य केले, असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. एनडीएला देशभरात मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळेच मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की विरोधकांनी केलेला चौकीदार चोर है हा प्रचार त्यांच्यावरच उलटला असून नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ प्रतिमेला मतदारांनी दिलेला हा कौल असल्याचे राऊत यांनी सांगितले. राज्यात शिवसेना-भाजपला मिळालेले यश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच लोकांनी मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, आणि राज्यात शरद पवार यांना नाकारलं असल्याचं सिद्ध झालं असल्याचे राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेने घेतलेल्या राम मंदिराचा मुद्दा दुसऱ्यांदा सत्ता आल्यावर तरी पूर्णत्वास जाईल का? याबाबत बोलताना राम मंदिर हा भाजपचा निवडणूक जाहिरनाम्यातील विषय असल्याने ते तो नक्की पूर्ण करतील असे राऊत यांनी सांगितले. शिवसेनेने सत्तेत राहून केंद्र सरकारवर केलेली टीका आणि त्यानंतर ऐनवेळी केलेली युती याबाबत बोलताना आता जुन्या गोष्टी मध्यमानी विसरून जाव्यात आणि पुढे काय होते ते पहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी दिवंगत हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या विधानावर बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याबाबत साध्वी यांना कधीही माफ करणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे ते आता त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकांनी एनडीएला दिलेला कौल मान्य करून त्यांच्या अपेक्षा आपण नक्की पूर्ण करू, असे राऊत यांनी सांगितले. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या 23 जागांपैकी 20 जगावर निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे सेनेच्या गोटात सध्या आनंदचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.