मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 1 ऑगस्ट 2022 ला अटक केली होती. त्यानंतर आज 102 दिवसांनी संजय राऊत यांची आर्थर रोड कारागृहातून जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. (Sanjay Raut bail). मात्र, संजय राऊत यांच्या आधी अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे दोन मंत्री आर्थर रोड कारागृहातच असून त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही आहे.
अनिल देशमुख 1 वर्षापासून कारागृहात: कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 1 वर्षापासून आर्थररोड कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे देशमुख यांचा मुक्काम आर्थररोड कारागृहातच राहणार आहे. न्या. एन. जे. जमादार यांच्या एकलपीठाने देशमुख यांचा जामीन मंजूर केला असला, तरी ईडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत, देशमुख यांच्या जामीन आदेशावर १३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. देशमुख कुटुंबांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टच्या खात्यातील दोन व्यवहार ईडीने ध्वजांकित केले होते. ती रक्कम गुन्ह्यातून मिळविलेली नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण न्या. जमादार यांच्या एकलपीठाने नोंदविले होते. न्यायालयाने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या साक्षीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्याशिवाय न्यायालयाने पीएमएलए कायद्याच्या कलम ४५चा लाभही देशमुख यांना दिला.
मनी लॉन्डरिंग प्रकरणात नवाब मलिक अटकेत: तसेच महाराष्ट्राचे माजी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना देखील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना ईडीची कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत म्हणजेच आर्थर रोड कारागृहात पाठवले. नवाब मलिक यांनी दाऊदच्या नातेवाईकाकडून कुर्ल्यातील जमीन खरेदी केली असून त्यांची ही संपत्ती देखील जप्त करण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मात्र 2 लाखांच्या जात मुचलक्यावर विशेष पी एम एल ए कोर्टाने आज सुटका केल्याने खऱ्या अर्थाने शिवसेनेला एक मोठा दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे.