मुंबई - राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातून जात आहे. यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. आता या यात्रेवर नुकतेच जेल मधून सुटलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत? - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही केवळ काँग्रेस पक्षाची नसून ही देशाला एकत्र आणण्यासाठी काढण्यात आलेली यात्रा आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी एकत्र आणत आहेत. भारत छोडो यात्रा ही केवळ यात्रा नसून एक आंदोलन आहे. राष्ट्रीय एकात्मता करण्यासाठी हे आंदोलन छेडलं गेलं आहे. सर्व समाज, धर्म, पंथ, प्रांत जोडण्यासाठी ही यात्रा निघाली असून, देशातील द्वेष भावना आणि कटूता मिटावी यासाठी ही यात्रा आहे, असे संजय राऊत म्हणाले. आपण तुरुंगात असताना शरद पवार यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. सातत्याने आपल्या कायदेशीर प्रक्रिया काय सुरू आहेत याबाबत आपले भाऊ सुनील राऊत यांच्याशी ते चर्चा करत होते, असेही संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेणार आहोत. काही महत्त्वाची कामे राज्याच्या प्रमुखांशी बोलून चर्चा करायची असतात. त्या कामासाठीच आपण देवेंद्र फडणवीस यांना लवकरच भेटणार आहोत, याचा पुनरुच्चार देखील संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाबाबत देखील आपण त्यांच्याशी या भेटीदरम्यान चर्चा करणार आहे. तसंच लवकरच दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं आहे.