मुंबई Sanjay Raut on Eknath Shinde Banner : राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. ते त्याठिकाणी भाजपा उमेदवाराच्या प्रचाराला गेले होते. अशातच राजस्थानातील एका बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. राजस्थानमधील एका बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावासमोर 'हिंदुहृदयसम्राट' असा उल्लेख केलेला आहे. या बॅनरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.
महाराष्ट्रात लोक जोड्यानं मारतील : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, त्या बॅनरवर काय मत व्यक्त करायचं? त्याच्यावर न बोललेलं बरं. त्यांनी स्वतः जाहीर केलं पाहिजे ते हिंदुरुदयसम्राट आहेत की नाहीत. त्यांचा पक्ष राहील की नाही? हाच प्रश्न आहे. भविष्यात शिंदे गट अजित पवार गट हे भारतीय जनता पक्षात विलीन होऊन कमळ चिन्हावर निवडणुका लढवणार आहेत. त्यांनी स्वतःला कितीही उपाधी लावून घेतल्या. तरी महाराष्ट्रात अशा उपाधी लावण्याची हिंमत नाही. लोक जोड्यानं मारतील.
उद्या ते अमेरिकेत जो बायडेनच्या प्रचाराला जातील : पुढं बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड तसंच शिंदे उद्या अमेरिकेत गेले तर तिथंही असे बॅनर लावतील. ते फार महान नेते आहेत, असे महान नेते राज्यात निर्माण झाले नाहीत. 2014 नंतर भारतीय जनता पक्षानं असे अनेक नेते दुसऱ्या पक्षातून घेऊन निर्माण केले. ते सर्व तात्पुरते आहेत. आता एकनाथ शिंदे हिंदुहृदयसम्राट असतील, तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट होण्यासारखं असं काय महान कार्य केलंय? ते आम्हाला पाहावं लागेल. आम्ही इतकी वर्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलं. त्यांचा संघर्ष पहिला. हिंदुत्वाची त्यांनी सत्तेसाठी तडजोडी केली नाही. बेइमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची नवीन परंपरा नव्या हिंदुत्वात सुरू झाली असेल तर हे पहावं लागेल", असंही यावेळी राऊत म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट दोनच : "भारतीय जनता पक्षाला राजस्थान मधील लोकांना महाराष्ट्रात काय चाललंय माहिती नाही. महाराष्ट्रात त्यांना कोणी विचारत नाही म्हणून ते बाहेर प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात त्यांची काय औकात आहे? टिमकी वाजवत आहेत. प्रचाराला खोके घेऊन गेले असतील. हिंदुहृदयसम्राट म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर बाळासाहेब ठाकरेंना लोकांनी मानलंय. त्यांचा त्याग मोठा आहे. जागृती आणण्याचं काम या दोघांनीच केलंय", अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समाचार घेतलाय.
हेही वाचा :