मुंबई - भाजप व शिवसेना यांच्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 चा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली होती, असा शिवसेनेने दावा केला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाबाबत अशी चर्चा झालीच नव्हती, असे वक्तव्य केले होते. यावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका करत आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, शेवटी मरण पत्करू, असे वक्तव्य केले आहे.
संजय राऊत यांची दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर प्रथमच त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राऊत बोलत होते.
हेही वाचा - महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण
दरम्यान, महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप अमित शाह यांनी केला होता.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र राजकारणाचा व्यापार करत नाही. बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरेंची अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. आमच्यासाठी ती खोली मंदिराएवढी पवित्र आहे. त्यामुळे त्या खोलीत झालेली बंद दाराआडची चर्चाही आमच्यासाठी तेवढीच पवित्र आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, की शिवसेना खोटं बोलत नाही.
हेही वाचा - घाटकोपरचे माणिकलाल मैदान वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात
बंद दाराआड झालेली चर्चा मोदींपर्यंत पोहोचवली गेली नाही, त्यामुळे ते जाहीर सभांमधून देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत गेले. निवडणूक प्रचारात त्यांना खोटे पाडणे हे आम्हाला योग्य वाटले नाही. परंतू मोदी आणि बाळासाहेबांच्या नात्यात कोणीतरी मिठाचा खडा टाकला आहे. मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधात दुरावा निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.