मुंबई - शिवसेना निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे, दिवाळीपूर्वी युतीचे फटाके फोडले जातील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झालेली आहे. उद्या (रविवारी) अमित शाह मुंबईत येत आहेत. त्यांच्याबरोबर बोलणे होऊन जागा वाटपाचा निर्णय होईल, असे राऊत म्हणाले. तसेच शिवसेना ५०-५० फॉर्म्युलावर ठाम असून आम्ही दोघे जुळे भाऊ असल्याचेही राऊत म्हणाले.
५०-५० टक्के फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम -
शिवसेना अजूनही 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहे. ज्याप्रकारे लोकसभेत 50-50 टक्के हा युतीचा फॉर्म्यूला होता. तसाच फॉर्म्यूला विधानसभेत असल्याचे राऊत म्हणाले. आमचा आणि मोदीजींचा विकासाचा मुद्दा सारखाच आहे. आम्ही आज कोणतीही टीका केली नाही. माध्यम तसे पसरवत असल्याचे राऊत म्हणाले.
आम्ही दोघे जुळे भाऊ, मुख्यमंत्री युतीचाच
प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना मोठा भाऊ कोण असा प्रश्न विचारला, त्यावेळी राऊत म्हणाले की भाजप आणि शिवसेना जुळे भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये कोणी मोठा नाही कोणी छोटा नसल्याचे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री युतीचाच होणार असल्याचे राऊत म्हणाले.
अमित शाह हेही युतीबीबत आग्रही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे युतीबीबत आग्रही आहेत. त्यांच्यासमोरच मातोश्रीवर युतीबाबत बोलणी झाली होती. तेव्हाच उद्धव ठाकरे आणि शाह यांनी निम्म्या निम्म्या जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे दोन्ही पक्षाचा ऐकमेकांशी सुसंवाद आहे.
आज निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. २१ ऑक्टोबरला राज्यात मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.