मुंबई Khichdi Scam Case : मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कथित खिचडी घोटाळया प्रकरणी 23 नोव्हेंबरला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांची तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली होती. कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने खिचडीचे कंत्राट दिलेल्या सह्याद्री या कंपनीचे मालक रवींद्र साळुंखे यांच्या बँक अकाउंटमधून संदीप राऊत (Sandeep Raut) आणि विधीता राऊत (Vidhita Raut) यांच्या बँक खात्यात आठ लाख आणि चौदा लाख रुपये वळते झाले असल्याचे, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर संदीप राऊत : या बँक ट्रांजेक्शनविषयी संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने विचारणा केली असता, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला माझ्या 300 चौरस फूट जागेचा वापर खिचडी बनवण्यासाठी करण्यात आला होता. त्या जागेचे भाडे म्हणून हे पैसे घेतले असल्याचे संदीप राऊत यांनी सांगितलं. मात्र संदीप राऊत यांनी दिलेले हे स्पष्टीकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या पचनी पडलेले नाही. कारण मुंबईत 300 चौरस फूट जागेचे दर महिना भाडे आठ लाख इतके मिळत नसून त्यांच्याकडे याबाबत कोणताही करार पत्र अथवा संबंधित कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर संदीप राऊत हे आहेत. त्याचप्रमाणे संजय राऊत यांची धाकटी कन्या विधीता राऊत हिचा देखील बँक खात्यात जवळपास 14 लाख रुपये रवींद्र साळुंखे यांच्या बँक खात्यातून वळते करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विधीता राऊत यांना देखील चौकशीसाठी सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधीता राऊत यांना लवकरच समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात संदीप राऊत दाखल : २३ नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात संदीप राऊत दाखल झाले होते. त्यानंतर दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास राऊत आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून निघाले होते. त्यावेळी संदीप राऊत यांनी मी कोणता घोटाळा केला नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
...म्हणून त्रास दिला जातो : संदीप राऊत यांची खिचडी घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तालयातील EOW कार्यालयात चौकशी करण्यात आले होते. संदीप राऊत उर्फ आप्पा यांनी कोणता घोटाळा केला नाही, असा दावा केला आहे. तसेच त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, माझ्या बँक खात्याचं स्टेटमेंट EOW ने मागितलं असून माझ्या बँक खात्यात 5 ते 6 लाख रक्कम आलेली दिसतेय. मात्र, त्याबाबत मी समाधानकारक खुलासा केला आहे. संजय राऊत यांचा भाऊ म्हणून मला त्रास दिला जातो आहे. जे खरे भ्रष्टाचारी, ते त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. मला पुन्हा बोलावलं तर मी पुन्हा येईन असे राऊत म्हणाले होते.
हेही वाचा -