औरंगाबाद - मराठवाड्याने औरंगजेबाला गाडले, निजामाला गुडघे टेकायला लावले. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही 'औरंग्या' झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून देण्यात आला आहे. त्यासोबतच खासदार इम्तियाज जलील यांना कोणत्याही शासकीय कार्यक्रमात बोलावू नये, असा फतवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढावा, अशी मागणी 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
औरंगाबादमध्ये झालेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (१७ सप्टेंबर) सोहळ्याला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला खासदारांनी गैरहजर राहाण्याची राज्यभरात चर्चा झाली. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी तर जलील यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा असेही म्हटले आहे. खासदार जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला अनुपस्थित राहाण्याची ही पाचवी वेळ होती. याआधी औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार असताना चारवेळेस या सोहळ्यापासून ते दूर राहिले होते. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
'सामना'तून जहरी टीका
खासदार जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शासकीय सोहळ्याला गैरहजर राहून निजामाची चाटुगिरी आणि रझाकारांना सलाम ठोकल्याचे सामनातून म्हटले आहे. जलील यांनी पाचव्यांदा ध्वजारोहण सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हा स्वातंत्र्यसेनानींचा अपमान असून कायद्याच्या भाषेत याला देशद्रोह म्हणातात असेही अग्रलेखात म्हटले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला अनुपस्थित राहाणारे औरंगाबादचे खासदार जलील यांना कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नये, असा फतवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढावा आणि जलीलगिरी बंद करावी, असे आवाहन अग्रलेखातून करण्यात आले आहे. त्याला मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात हे पाहाणे आता औत्सूक्याचे ठरणार आहे.