मुंबई - वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, असे सांगत राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना' अग्रलेखातून टीका केली आहे.
मात्र, मनसेवर टीका करताना शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले आहे. देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. नव्हे हाकलायलाच पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा - चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घूणपणे खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत.
भाजपशी पुन्हा सलगी केल्याची टीका
राज ठाकरे व त्यांच्या 14 वर्षे जुन्या पक्षाने मराठी हा मुद्दा घेऊन आधी पक्षाची स्थापना केली, पण आता त्यांचा पक्ष हिंदुत्ववादाकडे वळला असे एकंदरीत दिसते. आडवळणाने वळत आहे असे म्हणणे सोयीचे ठरेल. शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर भरपूर काम करून ठेवले आहे. त्यामुळे मराठी मनास साद घालून हाती काहीच लागले नाही. लागण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जनता पक्षाला हवे आहे म्हणून राज ठाकरे यांनी ‘हिंदू बांधव, भगिनी, मातांनो…’ अशी साद घातली असा टीकेचा सूर आहे. येथेही हाती काही लागेल याची शक्यता कमीच आहे.
हेही वाचा - ओवैसींवर भडकले रिझवी; म्हणाले.. लुटारू होते मुघल, त्यांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या
शिवसेनेने प्रखर हिंदुत्वाच्या विषयावरही देशभरात मोठे जागरण व काम केले आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाचा भगवा रंग कधीच सोडला नाही. हा रंग तसाच राहील. त्यामुळे दोन झेंडे निर्माण करूनही राज यांच्या झेंड्यास वैचारिक पाठबळाचा दांडा मिळण्याची शक्यता दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. यास रंग बदलणे कसे म्हणाल? त्याबाबत आक्षेप कमी व पोटदुखी जास्त. भाजप किंवा इतरांनी अगदी मेहबुबापासून इतर कुणाशीही निकाह लावला तरी चालतो, पण ही राजकीय व्यवस्था इतर कोणी केली की ते पाप ठरते. आम्ही सरकार स्थापन केले हे पाप नसून समाजकार्य आहे. सरकारची ध्येय, धोरणे स्पष्ट आहेत, असे अग्रलेखात म्हटले आहे.