मुंबई - गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचे काही म्हणणे मांडले आहे. ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले व येताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही शब्द दिल्याचे ते म्हणतात. आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ‘मंत्री करतो’ असा शब्द दिल्याची माहिती नाही. शिवसेना परिवारात सामील व्हा. एकत्र मिळून राज्य घडवू असा शब्द त्यांनी नक्कीच दिला असावा, असे सामनाच्या जाधव यांच्या नाराजीविषयी अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनीच माझे तिकीट कापले'
मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू, शंकरराव गडाख, यड्रावकर यांना दिलेला शब्द पाळला आहे, हे दिसलेच आहे. मंत्रिमंडळ तीन पक्षांचे आहे. त्यामुळे शब्द देण्यावर मर्यादा होत्या. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने ‘पाठिंबा’ देणाऱ्या घटक पक्षांवर मेहेरनजर केल्याचे दिसत नाही, असे म्हणत आघाडीतील इतर दोन पक्षांच्या तुलनेत शिवसेनेने सहकार्य करणाऱ्यांचा विचार केल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - नववर्षदिनी जगात भारतात झाला सर्वाधिक बालकांचा जन्म
राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचा धक्का दिला. आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणास राम राम ठोकण्याची त्यांची घोषणा सनसनाटी ठरली. मात्र, नंतर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी त्यांची समजूत घातली आणि आता प्रकाश सोळंकेंची नाराजीही दूर झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही जणांसाठी आनंदवार्ता असली तरी हायकमांडसाठी डोकेदुखी ठरत असते. पण, ठाकरे सरकारने विस्तारात सगळ्या जागा भरल्या. दोन-चार जागा शेवटपर्यंत शिल्लक ठेवून नाराजांना गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत राहायचे धंदे मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत, असेही अग्रलेखात म्हटले आहे.