मुंबई - भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन येतोय. नेहमीच देशाची मान उंचावत ठेणाऱ्या बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरींवर आधारित एक शो डिस्कव्हरी+ वर प्रदर्शित होणार आहे. ‘मिशन फ्रंटलाईन‘ असे नाव असलेल्या या शोची निर्मिती पॅन-इंडिया स्टार व बहुभाषिक चित्रपटांचा सुपरस्टार राणा दग्गुबती करीत असून, त्यानेच सूत्रसंचालकाची भूमिका निभावली आहे. आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर व आघाडीवर लढत असलेल्या सीमा सुरक्षा दलामधील हिरोजचे आयुष्य कसे असते, हे बघायला मिळेल.
या विशेष भागामध्ये राणा दग्गुबती बीएसएफ जवानाच्या कठीण जीवनाचा व जैसलमेरमधील मुरार पोस्टवर सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या खडतर आयुष्याचा स्वत: अनुभव घेताना दिसेल. जैसलमेर कँपचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे व अनेक लढाया आणि अनेक वीरगाथांची परंपरा त्याला लाभलेली आहे. दररोज स्वत:चे आयुष्य संकटात ठेवणाऱ्या सीमेवरील जवानांच्या आयुष्याच्या अंतरंगाचे दर्शन घडवणाऱ्या ह्या विशेष डॉक्युमेंटरीमुळे ह्या ‘अनसंग हिरोजच्या’ पराक्रमाची खोल जाणीव व कौतुकाची भावना निर्माण होणार आहे.
हेही वाचा - अरबाज खान व विक्रम गोखले अभिनित ‘रिटर्न तिकिट’चे टीझर पोस्टर झाले प्रदर्शित!
श्रोत्यांना राणाला आधी कधीही न बघितलेल्या स्वरूपात आणि अगदी जवानासारखी कामे करताना बघता येणार आहे. सॅल्युट करण्याचे प्रशिक्षण, शस्त्रे व बॅकपॅकसह रनिंग ड्रिल, फायरमॅन लिफ्ट आणि अडथळ्यांची उडी असे तो नेहमीचे शारीरिक प्रशिक्षण घेताना दिसेल. ह्या प्रशिक्षणाला व तयारीला आणखी वर नेताना राणा दग्गुबती शस्त्रे वापरण्याचेही प्रशिक्षण घेईल, लाईव्ह राउंडस फायर करेल, उंटावर बसून निगराणी करेल आणि घूसखोरांना पकडून जेरबंद करण्याच्या एका मिशनचे सिम्युलेशनही करेल व दलदलीच्या स्कूटर्सवर प्रवासासह इतर अनेक खडतर कामे करताना दिसेल.
त्याच्या अनुभवांविषयी बोलताना राणा दग्गुबतीने म्हंटले, “भारताचे सीमा सुरक्षा दल किंवा देशाच्या पहिल्या संरक्षण फळीला कोणत्याही सुट्ट्या नसतात, कोणतेही ब्रेक्स किंवा विश्रांतीचे क्षण नसतात. हे वीर आणि हिमतीचे जवान सतत दक्ष राहिले नाहीत, तर आपल्या देशाला जोखीम निर्माण होऊ शकते. त्यांना भेटल्याबद्दल, त्यांच्यासोबत राहिल्याबद्दल आणि त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेतल्याबद्दल मला अतिशय कृतज्ञ वाटत आहे. एक सामान्य नागरिक आणि देशवासी म्हणून ह्या अनुभवामुळे मला हे कळले की, सदैव चोवीस तास आपल्या सीमांचे संरक्षण करणे हे काय असते. हे जवान आपली जीवनरेषा आहेत, आपण त्यांच्यामुळेच स्वयंभू देश आहोत आणि ते खरे नायक आहेत.” राणाने पुढे म्हंटले, “जैसलमेरमध्ये मी जे अनुभवले, त्यानुसार मला वाटते की, ह्या जवानांचा दृढनिश्चय व शौर्याला देण्यात येणारी मानवंदना म्हणजे मिशन फ्रंटलाईन आहे व ह्याचे उद्दिष्ट आपल्या ज्यांच्या सेवा आपण अनेकदा गृहित धरतो, अशा संरक्षण दळांबद्दल लोकांच्या मनात प्रेरणा आणि कृतज्ञता निर्माण करणे, हे आहे.”
एपीएसी- डिस्कव्हरीचे डायरेक्ट टू कंज्यूमर हेड आयसॅक जॉन ह्यांनी म्हंटले, “डिस्कव्हरी+ हे आपल्या रसिक श्रोत्यांना सांगण्यात येणा-या प्रत्येक कथेमधून एक अतिशय उत्कंठावर्धक व विलक्षण अशी बाजू दाखवण्यासाठी कटिबद्ध आहे. मिशन फ्रंटलाईनमध्ये आमच्या दर्शकांना सीमेवरील जवानांच्या आयुष्याचे दर्शन घेण्याची अतिशय विलक्षण संधी मिळेल. भारत- पाकिस्तान सीमेवर विशेष प्रकारे जात डिस्कव्हरी+ ने दर्शकांना जवानांच्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्याची व ते घेत असलेल्या खडतर प्रशिक्षणाला बघण्याची संधी दिली आहे. देशाच्या सीमेवरील जवानांच्या कहाणीला संपूर्ण देशासमोर प्रस्तुत करण्यासाठी शोमध्ये राणा दग्गुबती आमच्या सोबत असण्याचा आम्हांला अतिशय आनंद होत आहे.”
‘मिशन फ्रंटलाईन’ २१ जानेवारीपासून डिस्कव्हरी+ वर पाहता येईल.
हेही वाचा - प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी येताहेत नवीन, फ्रेश, अनोख्या ऑन-स्क्रीन जोड्या!