मुंबई Salman Khan Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मिळणाऱ्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलीय. अभिनेता सलमान खानला कथित गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानाच सोशल मीडिया अकाउंटवरून धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय. मुंबई पोलिसांनी अभिनेत्याला मिळालेल्या धमकीची माहिती देखील विचारली आहे. सलमान खानला पोलिसांकडून Y+ सुरक्षा आधीच मिळालेली आहे.
सलमानच्या मित्रालाही धमकावलं : पंजाबी गायक अभिनेता गिप्पी ग्रेवाल याच्या कॅनडातील घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट करताना बिश्नोईनं कॅनडात गिप्पी ग्रेवालच्या घराबाहेर गोळीबार केल्याचं लिहिलंय. तसंच त्याला कोणीही वाचवू शकत नाही, असं गिप्पीला त्याचा मित्र सलमान खानला सांगण्यास सांगितलंय.
गिप्पीच्या बंगल्यावर अंदाधुंद गोळीबार : कॅनडातील व्हँकुव्हरमधील व्हाईट रॉक परिसरात गिप्पी ग्रेवाल यांचा बंगला असून रविवारी गोळीबाराची घटना घडली होती. गिप्पीच्या बंगल्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर बिश्नोई टोळीनं फेसबुकवर लिहिलंय की, तुम्ही सलमान खानला मोठ्या भावाप्रमाणे वागवता. मग तुझ्या भावानं तुला वाचवावं. हा सलमान खानला संदेशही आहे की, दाऊद तुला मदत करेल तुला आमच्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. या भ्रमात तू आहेस, असं या पोस्टमध्ये लिहिलंय. यावर गिप्पीनं एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देत तो सलमान खानचा मित्र नसल्याचं सांगितलं. गिप्पीनं वृत्तवाहिनीला सांगितलं की, तो सलमान खानला फक्त दोनदा भेटलाय.
सलमानला Y+ सुरक्षा : अभिनेता सलमान खानला पोलिसांकडून Y+ सुरक्षा देण्यात आलीय. यानुसार सलमान खानसोबत एक पोलीस अधिकारी आणि चार हवालदार सुरक्षेसाठी तैनात असतात. याशिवाय सलमान खानच्या घराबाहेरही दोन पोलिस हवालदारही तैनात आहेत. Y+ सुरक्षेमध्ये पुरविलेल्या पोलिस सुरक्षेत चार सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सलमानला मिळालेल्या धमकी प्रकरणी सलमान खाननं कोणतीही तक्रार दिलेली नसून पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. याआधीही मार्च 2023 मध्ये सलमान खानच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा ईमेल आला होता. या प्रकरणी पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार यांच्याविरुद्ध सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.
हेही वाचा :