मुंबई - काँग्रेसचे चांदिवलीचे उमेदवार नसीम खान यांच्या जुन्या व्हिडीओमध्ये मोडतोड करून समाजमाध्यमांवर प्रसारीत करणा-या आरोपीविरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यंकट गोड्डुल असे या ओरोपीचे नाव असून त्याच्यावर लोकप्रतिनिधी अधिकार कायदा कलम १२५ आणि भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १७१ (ग) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - भाजप शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करतयं, कर्डीलेंना चूकन साथ दिली - शरद पवार
व्यंकट गोड्डुलने नसीम खान यांच्या जुन्या व्हिडीओची मोडतोड करून त्यांची बदनामी करणारा व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमात पसरवला होता. खान यांनी याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकात आणि निवडणूक अधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक निरीक्षकांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून मंगळवारी व्यंकट गोड्डुल नावाच्या व्यक्तीवर व्हीडीओची मोडतोड करून बदनामी करण्याचा प्रयत्न आणि अपप्रचार केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधी अधिकार कलम १२५ व भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १७१ (ग) अंतर्गत साकीनाका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - 'ईडी'ची पीडा आता प्रफुल पटेल यांच्यामागे, म्हणाले नोटीस हातात आल्यास चौकशीलाही सामोरे जाऊ
यासंदर्भात नसीम खान यांनी सांगितले की, २० वर्षांपासून चांदिवली मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येत आहे. या निवडणुकीतही पुन्हा बाजी मारणार असे चित्र असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ३ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरायला हजारोंच्या संख्येने मतदार आले होते. लोकांचा मला मिळत असलेला प्रचंड पाठिंबा पाहून काही समाजकंटकांनी खालच्या पातळीवर जाऊन समाजमाध्यमातून अपप्रचार सुरु केला आहे. परंतु चांदिवली मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ते अशा अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. उलट अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देतील, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.