मुंबई - साकीनाका- खैराणी रोड येथील आशापुरा कंपाउंडला काल(शुक्रवारी) सायंकाळी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. आगीत ३० ते ३५ गाळे जळून खाक झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवल्यावर शोध मोहीम सुरू असताना दोन जणांचे मृतदेह मिळाले आहेत.
आरती लालजी जैस्वाल(२५) पियूष धीरज काताडीया (४२) अशी आगीत सापडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. काल सायंकाळी ५:२० वाजताच्या सुमारास खैरानी रोड, साकीनाका, कुर्ला (पश्चिम) येथे कारखान्यांमधील इलेक्ट्रिक वस्तूंना आग लागली होती. ही आग सायंकाळी ५:३९ वाजता लेवल ३ ची असल्याचे मुंबई अग्निशमन दलाकडून घोषित करण्यात आले होते.
आग लागलेल्या ठिकाणी केमिकल असल्याने आग आणखी भडकली. त्यानंतर लेव्हल ४ ची म्हणजेच भीषण आग असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आदी प्रशासनाच्या अग्निशमन दललाही घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले होते. घटनास्थळी मुंबई अग्निशमन केंद्राचे १६ फायर इंजिन, २ वॉटर टँकर, १० जम्बो वॉटर टँकर उपस्थित होते.
आग रात्री ११:१७ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आली. या आगीत सापडून २ व्यक्तींचा मृत्यू झाला असून शोध मोहीम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.