मुंबई - सचिन वाझे याचा सहकारी रियाजुद्दीन काझी याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. एनआयएने रविवारी रात्री उशिरा रियाझुद्दीन काझी याला अटक केली होती. अँटिलिया कार स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्याचा सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली होती.
हेही वाचा - गुढीपाडवानिमित्त निर्बंध शिथिल करा; सराफा व्यापाऱ्यांची मागणी
काझी सशस्त्र पोलीस दलात कार्यरत होता. तो वाझेसोबत तपास अधिकारी म्हणूनही कार्यरत होता. काझीवर मनसुख हिरेन आणि अँटिलिया प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात वाझेला अटक करण्यात आली होती. दरम्यान, काझी याला अनेकवेळा चौकशीला बोलवण्यात आले, अखेर त्याला रविवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.
अँटिलिया कार स्फोटक प्रकरणातील दुसरी अटक
अँटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील ही दुसरी अटक आहे. अटकेनंतर काझी याला १६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने निर्देश दिले होते.
पुरावे नष्ट केल्याचा आरोप
अँटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या कटात सहभागी असणे, तसेच पुरावे नष्ट करणे, या आरोपाखाली रियाजुद्दीन काझी याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात रियाजुद्दीन काझी याची तब्बल दहा ते बारा दिवस, सुमारे दहा तास एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचा - 'सरकार रोहित पवार यांच्यावर कारवाई करणार आहे का'