मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ या गाडीचा मालक हिरेन मनसुख याचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीजवळ आढळून आला. या संदर्भात विरोधी पक्षाकडून मुंबई पोलीस खात्यातील क्राइम ब्रांचचे अधिकारी सचिन वझे यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या आरोपानुसार सचिन वझे हे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीजवळ सर्वात आगोदर पोचलेले होते. याबरोबरच हिरेन मनसुख याच्यासोबत बऱ्याच वेळा फोनवर त्यांचे संभाषण झाल्याचाही आरोप देवेंद्र फडणीस यांनी केला होता. या संदर्भात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वझे यांच्याकडून तीन दिवस आधीच या प्रकरणाचा तपास काढून घेतला असल्याचे म्हटले आहे.
तीन दिवसांपूर्वी सचिन वझेंकडून तपास काढून घेतला-
तीन दिवसांपूर्वीच सचिन वझे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आलेला होता. तो नितीन आंबोस्कर या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात उत्तर देताना दिली.
सचिन वझेंकडून आरोपांचे खंडन -
ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळेस स्कॉर्पिओ गाडीजवळ गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सर्वात अगोदर पोचले होते. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. क्राइम ब्रांच या पथकासोबत मी त्या ठिकाणी पोचलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. या बरोबरच हिरेन मनसुख याचा जबाब आपण नोंदवला असून या अगोदर त्याला कधी भेटले नसल्याचे सचिन वझे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा तपास एटीएसकडे -
हिरेन मनसुख याचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यानुसार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीतील स्फोटक व धमकीचे पत्र या संदर्भात आता एटीएसकडून तपास केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - पोलिसांना भेटायला गेले त्यानंतर परतलेचं नाहीत, मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा खुलासा