मुंबई Sachin Tendulkar Statue : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आज सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळी सचिन तेंडुलकरसह त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
२२ फूट उंची : मुंबई क्रिकेट असोसिएशननं वानखेडे स्टेडियमवरील 'सचिन तेंडुलकर स्टँड'च्या बाजूला हा भव्य पुतळा उभारला आहे. या पुतळ्याची उंची तब्बल २२ फूट आहे. उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार आणि मुंबई क्रिकेट असोसीएशनचे अध्यक्ष अमोल काळे हे देखील उपस्थित होते.
वानखेडे स्टेडियम सचिनचं होम ग्राऊंड : सचिन यंदा ५० वर्षांचा झाला. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशननं या वर्षाच्या सुरुवातीला सचिनचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता. वानखेडे स्टेडियम सचिनचं होम ग्राऊंड असल्यानं या स्टेडियमवर सचिनचा भव्य पुतळा उभारला जावा, असं एमसीएनं ठरवलं. विशेष म्हणजे याच स्टेडियममधील एका स्टँडला आधीच सचिनचं नाव देण्यात आलं आहे.
वानखेडे स्टेडियम सचिनसाठी खास : वानखेडे स्टेडियम सचिनसाठी अत्यंत खास आहे. त्यानं या मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. याचं स्टेडियमवर भारतानं २ एप्रिल २०११ रोजी श्रीलंकेचा पराभव करून एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. सचिनला त्यावेळी टीममधील सर्व खेळाडूंनी खांद्यावर घेत संपूर्ण मैदानाला फेरी मारली होती. यासह सचिननं आपला अखेरचा कसोटी सामना देखील इथेच खेळला होता. नोव्हेंबर २०१३ मध्ये सचिननं वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीनंतर वानखेडे स्टेडियमवर आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.
हेही वाचा :