मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने विरोधीपक्ष ठाकरे सरकारवर ताशेरे ओढत आहे. तर, विरोधकांना गुजरातचा दाखला देत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. अहमदाबाद उच्च न्यायालयाने कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूवर आणि रुग्णालयातील अपुऱ्या सोई-सुविधांवर नाराजी व्यक्त करत गुजरात सरकारला चांगलेच फैलावर घेतले आहे.
राज्यातील विरोधी पक्षाने महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यापेक्षा गुजरातचा दौरा करून यावा, म्हणजे त्यांना महाराष्ट्रातील तयारीची कल्पना येईल, असा सल्ला सामनाच्या आजच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी ठाकरे सरकारची बदनामी भाजप करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी विरोधी पक्ष यशस्वी होणार नाही. दरम्यान, विरोधी पक्ष राज्य सरकारने जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, यासाठी मागणी करत आहे. त्यालाही सामनातून उत्तर देण्यात आले आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज संपूर्ण देशासाठी जाहीर केले आहे. तरीही तुम्ही वेगळ्या पॅकेजची मागणी करत असाल तर केंद्र सरकारचे पॅकेज पोकळ आणि कुचकामी आहे, असे म्हणत या पॅकेजची तुलना रिकाम्या खोक्याशी केली आहे.
खोक्याची जाहीरात करण्यापेक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राज्यातील कोरोनासंदर्भातील उपाययोजना बघाव्या, असा टोला सामनातून लगावला आहे. उच्च न्यायालयाने गुजरातबद्दल मांडलेले निष्कर्ष देशातील आरोग्य यंत्रणांचे डोळे उघडणारे आहेत.
अहमदाबादच्या मुख्य शासकीय रुग्णालयात आतापर्यंत ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने गुजरातच्या कोरोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी केली आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण मरण्यासाठी दाखल होतात, अशी परिस्थिती राज्यात आहे. तेथील विरोधी पक्ष फालतू राजकारणात न पडता राज्य सरकारला जमेल तेवढी मदत करत आहे.
याउलट महाराष्ट्रात राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा उभ्या केल्या आहेत. देशातील पहिले फिल्ड हॉस्पिटल वांद्रे-कुर्ला संकुलात उभे राहीले आहे. ऑक्सिजन, आयसीयू बेड्स असलेली रुग्णालये जिल्हास्तरावर तयार केली आहेत. मात्र, यातील काहीच विरोधी पक्षाला दिसत नाही. कारण त्याच्या शरीरात द्वेषाचा वायू पसरला आहे, अशी टीका सामनातून लगावण्यात आली आहे.
ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता तेथील विरोधी पक्ष बिनकामाचा आणि ज्या राज्यात भाजप विरोधी पक्षात आहे, तो जनतेचाच आवाज, हा काय प्रकार आहे, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला. ज्या राज्यात ऑक्सिजन सिलिंडरअभावी २०० अर्भक तडफडून मरतात त्या राज्यात सर्व आलबेल, पण महाराष्ट्रात १५ हजारांवर रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले त्या सरकारला अपयशी ठरवण्याचे हे कुटील कारस्थान आहे, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरून भाजपला सामनात धारेवर धरले आहे. श्रमिकांना गावी जाण्यासाठी रेल्वेची मागणी करूनही जर रिकाने खोकेवाले टाळाटाळ करत असतील आणि श्रमिकांना रस्त्यावर झोपावे लागत असतील, तर विरोधी पक्षाने केंद्र सरकारला दोष द्यावा. पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांनी रिकामी डोकी महाराष्ट्राती कोरोना युद्धात अडथळे आणत आहेत. या रिकाम्या खोक्यांत रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधारकोठड्या पाहायला पाठवायला हवे, असा टोला सामनाच्या आजच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.