मुंबई - काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर आणि उत्तर प्रदेशातील दोन घटनांमध्ये चार साधूंची हत्या झाली. दोन्ही प्रकरणांमुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दोन्ही ठिकाणचे आरोपी अटकेत आहेत. मात्र, दोन्ही प्रकरणांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा होता. पालघर येथील साधूंच्या हत्येचे विरोधकांनी राजकारण केले. सुदैवाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना असल्या प्रकाराला सामोरे जावे लागले नाही. राजकारणातील मानवी मनाचे हे कंगोरे गमतीचे आणि तितकेच गुंतागुंतीचे आहेत. उत्तर प्रदेशातील साधू हत्येचे राजकारण केले गेले नाही, म्हणून तेथील जनता या खेळाला मुकली असे म्हणण्यास हरकत नाही, अशी टीका सामन्यातून करण्यात आली.
साधूंची किंबहुना कुठल्याही निरपराध व्यक्तीची हत्या होणे हे अतिशय चुकीचे आणि अमानुष आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वत: एक साधू आहेत, त्यामुळे ते साधूंचे मन जाणतातच. म्हणूनच त्यांनी पालघर मध्ये जमावाने साधूंची हत्या केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर पुढच्या दहा दिवसांतच योगी महाराजांच्या राज्यातील बुलंदशहरमधील देवळात दोन साधूंची गळा चिरून हत्या करण्यात आली. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगींना फोन करुन चिंता व्यक्त केली. हे प्रसंग राजकारण करण्याचे नसून, गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
योगींनी ठाकरेंना फोन करून चिंता व्यक्त केली, त्यात त्यांची चिंता होती. मात्र, ठाकरेंनी योगींना फोन करून चिंता व्यक्त केली याचे काही लोकांनी लगेच राजकारण केले. बुलंदशहरातील घटना वेगळी आहे आणि पालघरमधील वेगळी, तुम्ही तुमचा महाराष्ट्र सांभाळा वगैरे विधाने योगींच्या कार्यालयातून करण्यात आली. म्हणजेच भाजपची सत्ता नसलेल्या एखाद्या राज्यात एखादी दुर्घटना घडली की, त्याला राजकीय रंग दिला जातो आणि भाजपशासित राज्यातील घटनेबाबत काहीही बोलले जात नाही. भगव्या-भगव्यात आणि रक्ता-रक्तात फरक करणारे मानवी मन किती संवेदनशील आहे याचे हे उदाहरण म्हणता येईल.
दोन्ही ठिकाणी झालेली हत्याकांडे ही माणुसकीला काळीमा फासणारीच आहेत. फरक इतकाच आहे की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करत आहे तसा योगी महाराजांच्या राज्याच दिसत नाही. त्यांनी भगवी वस्त्रे घालून सत्यमेव जयतेच्या पाट्या भिंतीवर लटकवून ठेवल्या आहेत. बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे.