नवी मुंबई - खारघर मधील ग्रामविकास भवन मध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांना कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र, ही माहिती येथील कर्माचाऱ्यांना समजताच आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीमुळे हे कर्मचारी काम सोडून निघून गेले आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील परदेशात जाऊन आलेल्या नागरिकांना तपासणीनंतर ग्राम विकास भवन मध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. शनिवारी 9 लोकांना उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून, ग्रामविकास भवन मध्ये हलविण्यात आले होते. यामध्ये 'कोरोना' झालेल्या रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली होती.
हेही वाचा -'कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी मुंबई-पुण्यात लॅबची संख्या वाढविणार'
ग्रामविकास भवन मध्ये १०० खोल्या राहण्यासाठी उपलब्ध आहेत. परदेशातून आलेले नागरिक तपासणीनंतर ग्राम विकास भवन मध्ये 14 दिवसासाठी ठेवण्यात येतील, ही माहिती मिळाल्यावर आपल्यालाही कोरोनाची लागण होईल, या भीतीने येथे कार्यरत असलेले शासकीय, खाजगी कर्मचारी काम सोडून गेले आहेत.
सद्यस्थितीत पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी ग्राम विकास भवनमध्ये परदेशातून आलेल्या सुरक्षेखातर ठेवलेल्या लोकांची काळजी घेत आहेत. पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी खारघर येथील ग्रामविकास भवन मध्ये कॉरन्टाईन सेंटर उघडल्यानंतर तेथील शासकीय कर्मचारी पळून गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा -कोरोनाची धास्ती : मुंबईतील खासगी टूर ऑपरेटर्सवर पोलिसांकडून बंदी
ग्रामविकास भवन मधील पळून गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्या शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार करणार असल्याचे पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.