मुंबई - 'शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करत आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी', असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
'दोन्ही काँग्रेसच्या मध्यात उद्धव ठाकरे अडकलेत'
'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहेत. दोन्ही कॉंग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणे अवघड होत आहे. महाराष्ट्राचे हित, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी; छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी शिवसेना-भाजपने एकत्र यावे' असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
'बाळासाहेब असते तर...'
'काँग्रेस आणी राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेनेने भाजपशी युती करावी, ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही, अशी प्रताप सरनाईक यांची सूचना योग्य आहे. त्यांच्या सूचनेचा शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांनी यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजपशी युती करावी', असेही आठवलेंनी म्हटले आहे.
काय आहे सरनाईकांच्या पत्रात?
सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सरनाईक यांच्या पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे नमूद आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असे प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला आहे. या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रार केली आहे. “कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दलाल व शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे, त्यालाही कुठेतरी आळा बसेल, आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुटुंबियांवर सुद्धा सतत आघात होत आहेत. खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला, की दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवणे असे प्रकार होत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे थांबेल”, असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा - प्रताप सरनाईकांच्या पत्रातील आरोप गंभीर; सर्वांनी त्याचा अभ्यास करावा - संजय राऊत