मुंबई - बालके जन्माला आल्यावर त्यांना विविध प्रकारच्या लस दिल्यानंतरही अतिसारामुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. म्हणून अतिसारामुळे बालकांचे होणारे मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका 'रोटा व्हायरस' लस मोफत देणार आहे. पालिकेकडून बालकांना नियमाची लसीकरण केले जाते, त्यात आता या लसचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यामध्ये रोटा व्हायरस लसचा २० जुलैपासून नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत आरोग्य केंद्रे, दवाखाने, प्रसुतिगृह, सर्वसाधारण रुग्णालये, प्रमुख रुग्यालये या सर्व लसीकरण केंद्रात रोटा व्हायरस लसीचा राज्य शासनाकडून लसीचा पुरवठा झाला आहे. यामध्ये मुंबईतील १ वर्षाखालील मुलांना दरवर्षी ही लस मोफत देण्यात येणार आहे. तरी सर्व सुजाण पालकांनी सदर लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
काय आहे रोटा व्हायरस लस -
बालकांमध्ये अतिसारामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंध हा प्रभावी पर्याय आहे. भारतासह जगातील ९३ देशांत राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सदर लस अंतर्भूत करण्यात आली. रोटा व्हायरस लस ही तोंडावाटे दिली जाते. तर जन्माच्या ६ व्या, १० व्या व १४ व्या आठवडय़ात अन्य लसींसोबत ही लस दिली जाणार आहे. मुंबईत या लसीचा समावेश दिनाक २२ जुलै, २०१९ पासून करण्यात आला आहे. त्यासाठी आरोग्य केंद्रे, दवाखाने, प्रसुतिगृह, सर्वसाधारण रुग्णालये, प्रमुख रुग्यालये येथील कर्मचाऱयांना प्रशिक्षित करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.