मुंबई - लहानपणापासून साहेबांना पहात आलो आहे, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. सध्या चालू असलेल्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावे. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटत असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते. अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शनिवारी अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पवार कुटुंबात उभी फुट पडल्याचे दिसून आले. अजित पवारांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्का बसला. त्यांच्या या निर्णयानंतर दिलिप वळसे पाटील, सुनिल तटकरे त्यांचे मन वळवण्यासाठी गेले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. अजित पवार हे त्यांच्या निर्णयाव ठाम असल्याचे दिसून आले.