मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गाच्या कामादरम्यान बुधवारी पहाटे गिरगाव येथील ठाकूरद्वार ते क्रांतीनगर दरम्यानचा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. तब्बल 14 फूट रस्ता खचला असून परिसरात पाणी आणि गाळ जमा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आणि कंत्राटदाराच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. तर, या कामासाठी वेळ लागणार असल्याने हा 100 मीटरचा रस्ता दोन दिवस बंद राहील, अशी माहिती एमएमआरसीच्या प्रवक्त्यानी दिला आहे.
गिरगाव येथील जेएसएस रोडवर मेट्रो 3चे काम सुरू आहे. मेट्रो 3ची कामे करताना सर्व काळजी घेतली जात असल्याचा दावा एमएमआरसीकडून केला जात आहे. मात्र, हा दावा कसा फोल आहे याचा प्रत्यय बुधवारी पहाटे आला. पहाटे तीन - साडेतीनच्या सुमारास क्रांतीनगर येथील रस्ता खचला आणि तिथे 14 फुटाचा खड्डा पडल्याची माहिती 'आम्ही गिरगावकर' ग्रुपचे गौरव सागवेकर यांनी दिली. ही माहिती मिळताच आम्ही तिथे गेलो आणि पालिका-एमएमआरसी-कंत्राटदाराला बोलावले असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. ही घटना पहाटे घडल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. पण, जर ही घटना सकाळी वा गर्दीच्या घडली असती आणि काही अनपेक्षित घडले असते, तर त्याला जबाबदार कोण असा सवाल गौरव यांनी केला आहे.
हे केवळ कंत्राटदार आणि एमएमआरसीच्या गलथान कारभारामुळेच घडले आहे, असे म्हणत आता गिरगावकरांनी यावर संताप व्यक्त केला आहे. तर, एमएमआरसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार जेएसएस रोडवरील रस्ता खचला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता या कामासाठी दोन दिवस बंद राहील. तर, आज रस्त्याच्या आजूबाजूच्या इमारतीवरही लक्ष ठेवून असल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - भाईंदर पूर्व येथे एनसीबीची कारवाई; दोघांकडून 2 किलो चरस जप्त