मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांची आज (सोमवारी) एनसीबीने सलग दुसर्या दिवशी चौकशी केली. आज तब्बल 8 तास एनसीबीने तिची चौकशी केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या (मंगळवारी) अभिनेत्रीला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल.
चौकशीपूर्वी एनसीबीने सांगितले होते की, रिया जेव्हा चौकशीसाठी हजर होईल तेव्हा तिला तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतच्या घराचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि सुशांतचा वैयक्तिक कर्मचारी दीपेश सावंत यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येईल. विशेष म्हणजे, एजन्सीने मोबाइल फोन, चॅट रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक डेटा प्राप्त केला होता ज्यात हे लोक बंदी घातलेल्या औषधांच्या खरेदीत सामील असल्याचे समोर आले.
गेल्या काही दिवसांतील या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनसीबीने या तिघांना अटक केली आहे. यापूर्वी सक्तवसूली संचलनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत (सीबीआय) रियाची चौकशी केली गेली होती. रियाने बर्याच वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की तिने स्वत: कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही.
हेही वाचा - सुशांतसिंह प्रकरण : अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानी ताब्यात