मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान आतापर्यंत ईडीने सुशांतसिंह राजपूत याचा चार्टर्ड अकाउंटंट, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा व सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांची चौकशी केलेली आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्ती ही दुपारी बारा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाली होती. त्यानंतर तब्बल नऊ तास रिया चक्रवर्तीची ईडी अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी केलेली आहे.
अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिल्यानंतर तब्बल नऊ तासानंतर कार्यालयाबाहेर चक्रवर्ती आली होती. त्यावेळेस माध्यमांनी रिया चक्रवर्तीला गराडा घालून झालेल्या चौकशीबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर न देता रिया चक्रवर्ती ही निघून गेली. दरम्यान 8 ऑगस्ट रोजी या संदर्भात सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी याची ईडी चौकशी होणार असून त्यास ईडीकडून समन्स बजाविण्यात आला आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूतने १४ जूनरोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर, सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी 25 जुलैला पटना शहरातील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली होती.