मुंबई - लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरित मजूर, कामगार व नागरीक आपल्या राज्यात जाण्यासाठी परतीच्या वाटेवर निघाले आहेत. कोणी पायी प्रवास करत, तर कोणी रेल्वेने प्रवास करत आहे. त्यात आता या स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी सोडण्यासाठी रिक्षाचालकही पुढे आले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना मुंबई बाहेर व परराज्यात जाण्यासाठी ऑफलाईन परवानगी देण्यात यावी, अशी मागणी टॅक्सीमन युनियनचे अध्यक्ष ए. एल. क्वाड्रास यांनी परिवहन विभागाकडे केली आहे.
परिवहन विभागाकडून रिक्षा टॅक्सी चालकांना ऑनलाईन तात्पुरती आणि विशेष परवानगी देण्यात येते. त्यानुसार आता अनेक रिक्षा चालक त्पुरती परवानगी घेऊन आपल्या गावी जात आहेत. मात्र, अनेक रिक्षा टॅक्सी चालकांकडे स्मार्ट फोन व संगणक नाहीत, त्यात लॉकडाऊनमुळे सायबर कॅफे बंद आहेत. तरी परिवहन विभागाकडे अपुरा कर्मचारी आहे. त्यामुळे ऑनलाइन परवानगी ऐवजी ऑफलाईन परवानगी देण्याचा विचार परिवहन विभागाने करावा, असे क्वाड्रास यांनी म्हटले आहे.
सुमारे 1 हजार काळी पिवळी टॅक्सी व 5 हजार रिक्षा चालक हे मुंबई महानगर प्रदेशातून आपल्या राज्याकडे रवाना झाले आहेत. शहरात सुमारे 45 हजार काळी पिवळी टॅक्सी असून 5 लाख रिक्षा मुंबई महानगरात आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे उत्पन्नाचे साधनच नसल्याने या चालकांनी बिहार, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश मधील आपल्या गावाची वाट धरल्याचे क्वाड्रास यांनी सांगितले.
बस, ट्रक चालक जादा भाडे आकारत असल्याने रिक्षा चालकांनी त्यांच्या वाहनाने आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. काही रिक्षा चालक 25 ते 50 च्या ग्रुपने मुंबईतून गावाकडे रवाना होत असल्याचे रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. रिक्षा, टॅक्सी चालकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दरवर्षी परिवहन विभाग काही महिन्यांसाठी तात्पुरती ऑनलाइन परवानगी देते. तशीच परवानगी रिक्षा टॅक्सी चालकांना ऑनलाइन देण्यात आली असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली.