मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तब्बल अकरा जणांचे जबाब नोंदवले आहेत. सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यानंतर रिया चक्रवर्ती आपला जबाब नोंदविण्यासाठी आज (दि. 18 जून) सकाळी 11 वाजता वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (दि. 14 जून) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला. सुरुवातीला वांद्रे पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने नजीकच्या काळात काही नव्या चित्रपटांचा करार केला होता. मात्र, अचानकपणे वेळे आधीच यातील काही चित्रपटांचा करार मोडण्यात आला होता. अचानक सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत करण्यात आलेला करार का मोडण्यात आला, याचे कारण तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचे आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, गेल्या महिन्यात सुशांत सिंग राजपूत याचे बॉलिवूडमधील काही निर्मात्यांसोबत काही कारणांवरून खटके उडाले होते. मात्र, या मागचे कारण अद्याप समोर न आल्याने त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
याप्रकरणी बिहारमध्ये आठ जणांविरोधात तक्रार
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, आदित्य चोप्रा यांच्यासह आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बिहारमधील मुजफ्फरनगरमध्ये ही तक्रार केली गेली. या आठ जणांनी संगनमत करून सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलेला आहे. बिहारमधील पेशाने वकील असलेल्या सुरज कुमार ओझा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : 'त्या' 5 निर्मात्यांची होणार चौकशी