मुंबई - मराठा समाजातील विद्यार्थी गेले सहा दिवस आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात काही अडचणी आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असे महसूल मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि मराठा विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्याव्यात, या मागणीसाठी आझाद मैदानात गेले सहा दिवस विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांची महसूल मंत्री व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली त्यानंतर थोरात बोलत होते.
6 दिवस विद्यार्थी आंदोललनाला बसले आहेत
यावेळी बोलताना, काही अडचणी निश्चितपणे निर्माण झाल्या आहेत. परीक्षा दिल्यानंतर भरती होणार होती पण सुप्रीम कोर्टाचा स्टे आला. विशेषतः मराठा समाजाच्या मुलांना अडचणी आल्या आहेत पण आम्ही कायदेशीर बाबतीत सर्व चर्चा करत आहोत. आजही त्यांची इच्छा आहे त्यांच्या मुद्यावर चर्चा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेही चर्चा करत आहेत. त्यांच्याशी चर्चा मी करेन. गेली 6 दिवस विद्यार्थी आंदोललनाला बसले आहेत त्यांची बाजु ऐकून घेणे ही शासन म्हणून जबाबदारी पार पाडतोय. कायदेशीर तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयातील केस
यशस्वी होण्याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत. केसबाबत आम्ही कसर कुठेही ठेवत नाहीत. 100 टक्के प्रयत्न करत आहोत. त्यात आम्ही यशस्वी होऊ असे थोरात यांनी सांगितले.
यातील बारकावे पाहावे लागतील -
मंत्रिमंडळातील सदस्य विजय वडेवट्टीवर यांनी मराठा आरक्षणबाबत गायकवाड समितीने दिलेला अहवाल खोटा असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना विजय वडेवट्टीवर यांच्याशी मी स्वतः बोलेन त्यांना नक्की काय म्हणायचं होत. यातील बारकावे मला पाहावे लागतील असे थोरात म्हणाले.
राजू शेट्टी यांनी ट्रॅक्टर मार्च काढला असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना नक्की काय घडलं ते मला पाहावं लागेल असे थोरात म्हणाले. मुंबईचा महापौर काँग्रेसचाच होईल त्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेसचाच महापौर होईल, असे म्हटले आहे. यावर बोलताना, कुणाचाही महापौर झाला तरी तो महाविकास आघाडीचा असेल, असे थोरात म्हणाले.