मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. यामध्ये काल मुंबईत कंगना दाखल झाली. याअगोदरच काल तिच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली. यानंतर कंगना समर्थकांनीदेखील या कारवाईवर टीका केली आहे. त्यात आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याविषयी बोलताना, शिवसेना सरकारने सूडबुद्धीने जाणीवपूर्वक कंगनाचे ऑफिस तोडले आहे, असे म्हटले.
रामदास आठवले कंगनाबाबत बोलताना म्हणाले की, कंगनाने आज काही वक्तव्य केल्याचे मला माहीत नाही. पण शरद पवारांना माहिती होते, त्यांचाच कालखंडामध्ये कंगनाच्या इमारतीचे आणि कार्यालयाचे बांधकाम झाले आहे. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात इमारतीला परवानगी भेटली होती, अशी कंगनाने माहिती दिली आहे.
हेही वाचा - मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची पवारांनी घेतली पोलीस आयुक्तांकडून माहिती
काल एक तर कंगनाचे कार्यालय तोडायला नको होते, शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेकडून जाणीवपूर्वक तिला त्रास दिला जात आहे. मुंबईत दाऊदच्या देखील इमारतीला तोडण्याचे आदेश आहेत. मात्र, ती इमारत पालिका प्रशासन तोडत नाही, कारण सत्ताधारी त्यांना भितात. तसेच मुंबईमध्ये 52 हजार अशा अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आहेत. यामध्ये फक्त पाच हजार अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा चालला आहे. अनधिकृत बांधकामांना पालिकेचे अधिकारी पैसे घेऊन परवानगी देतात, असा देखील आरोप आज रामदास आठवले यांनी केला. कंगनाच्या पाठीशी आम्ही आहोत असे देखील आठवले म्हणाले.