मुंबई - मुंबई विभागीय मंडळात मागील सहा वर्षांनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी राज्यात सर्वाधिक गुण मिळवण्यात आघाडी घेतली आहे. तर पहिल्यांदाच मुंबई विभागाचा निकाल हा ९६.७२ टक्के इतका लागला असल्याने मागील काही वर्षांत कमी निकाल लागण्याच्या परंपरेला छेद दिला आहे.
दहावीच्या या निकालात मुंबई विभागातील शाळांनीही कमाल केली असून ३ हजार ७७४ शाळांपैकी १ हजार ७१४ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. या शाळा राज्यातील सर्वाधिक शाळा ठरल्या आहेत. तर ८८२ शाळांचा निकाल हा ९० ते ९९ टक्क्यांच्या दरम्यान लागला असल्याने दहावीत मुंबई विभागाने राज्यात चवथ्या स्थानावर येत आपली एक वेगळी छाप या निकालावर उमटवली आहे. तरीही यात शून्य टक्के ते १० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या ३ वर येऊन थांबली आहे.
मुंबई विभागात दहावीच्या परीक्षेला एकुण ३ लाख ३१ हजार १३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३ लाख २० हजार २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकुण निकाल हा ९६.७२ टक्के इतका लागला आहे. मागील सहा वर्षांतील हा सर्वाधिक निकाल आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या प्राविण्यासह प्रथम आलेल्यांमध्ये १ लाख ८ हजार ४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ६० टक्के आणि त्यापुढे गुण मिळवणाऱ्यांची संख्या ही १ लाख १७ हजार ८१९ इतकी असून यावेळी मुंबई आणि परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी चुरस पहावयाला मिळणार आहे.
मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक निकाल हा मुंबई उपनगर-१चा लागला असून ९७.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या खालोखाल बृहन्मुंबईचा ९७.१०, मुंबई उपनगर-२चा ९६.५० टक्के, ठाणे जिल्ह्याचा ९६.६१ टक्के आणि तर सर्वात कमी निकाल हा रायगड जिल्ह्याचा ९६.०७ टक्के इतका आहे.
मुंबई विभागाचा २०१५ मध्ये सर्वाधिक असा ९२.९० टक्के इतका लागला होता. त्यानंतर २०१६ मध्ये ९१.९० टक्के, २०१७ मध्ये ९०.०९ टक्के, २०१८ मध्ये ९०.४१ टक्के आणि २०१९ मध्ये सर्वात कमी असा ७७.०४ टक्के इतका लागला होता.